युतीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा सुरू राहणार : आमदार दीपक केसरकर

आ. दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल 

नगराध्यक्ष पदासाठी ॲड. निता कविटकर : नगरसेवक पदासाठी २० उमेदवार रिंगणात 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याबाबत आमदार दीपक केसरकर हे अजूनही आशावादी आहेत. सावंतवाडीतील नगराध्यक्ष पदावर शिवसेनेकडून दावा करण्यात आला असून, युती झाल्यास नगरसेवक पदाच्या काही जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती आमदार केसरकर यांनी आज येथे दिली.

ते म्हणाले, युतीच्या वाटाघाटीत आम्ही वेंगुर्ला नगरपरिषद भाजपला सोडण्यास तयार होतो आणि आजही आहोत. मात्र, सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर आमचा दावा कायम आहे. उद्यापर्यंत युती संदर्भात चर्चेला वेळ आहे, तसेच त्यापुढे जाऊनही शेवटच्या क्षणी सुद्धा युती झाल्यास आम्ही नगरसेवक पदाच्या काही जागा सोडण्यास तयार आहोत. याबाबत संबंधित उमेदवारांना कल्पना देण्यात आली आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज आमदार केसरकर यांच्या उपस्थितीत भरण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी ॲड. नीता कविटकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर नगराध्यक्ष पदासह २० ही नगरसेवकांचे उमेदवार निश्चित झाले असून, ९० टक्के उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ देण्यात आले आहेत. काही जागांबाबत उमेदवारी देण्यावरून अजूनही तिढा कायम आहे, परंतु हा तिढा सामोपचारातून मिटवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “सावंतवाडीची निवडणूक ही विचारांची, विकासाची निवडणूक आहे. आम्ही विकास केल्यामुळे ही निवडणूक शांतपूर्ण आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने लढणार आहोत.” नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता कविटकर या सर्वसामान्य घराण्यातील असून, सावंतवाडी बार असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण सावंतवाडीतच झाले आहे. त्यामुळे नागरीक त्यांना साथ देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी यावेळी सांगितले की, “सावंतवाडी नगर परिषदेची ही निवडणूक दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत. सावंतवाडीची जनता आमच्या पाठीशी आहे. तर

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत कविटकर यांनी विश्वास व्यक्त केला, “मी पेशाने वकील असले तरी गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरात व जिल्ह्यात महिला जिल्हाध्यक्ष या नात्याने काम पाहत आहे. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात केलेला विकास आणि जनतेचा पाठिंबा या बळावर विजयाचा विश्वास व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना शिवसेनेचे ज्येष्ठ, कनिष्ठ सर्व पदाधिकारी, महिला भगिनी, उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.