कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘रद्दी’ या कवितेतून प्रेरणा घेऊन लघुपटाची निर्मिती
वेंगुर्ले : दाजी नाईक
कवीच्या जीवनातील संवेदनशील पैलू उलगडण्याचा प्रयत्न या लघुपटाचे लेखक श्री. कमलेश प्रकाश अणावकर यांनी केला आहे. तसेच श्री. धीरज बाळकृष्ण कांबळे यांनी आपल्या दिग्दर्शनातून कथेतील भावविश्व यशस्वीरित्या साकारले आहे.
या लघुपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘गाव गाता गजाली’ फेम श्री. अभय नेवगी यांनी साकारलेली कवी कृष्णनंदन ही भूमिका. त्यांच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव, नजरेतील अंतर्मुखता आणि अभिनयातील सहजता यांतून कवी ची भूमिका अंतर्मुख करते.
कवीच्या आयुष्याशी जोडलेली असंख्य भावनिक आंदोलने समजून घेणाऱ्या सहचारिणीची भूमिका नाट्य अभिनेत्री सौ. वैभवी सोकटे परुळेकर यांनी अतिशय समर्पकपणे साकारली.
यश नरेश शिरोडकर यांनी या लघुपटाला दिलेले पार्श्वसंगीत कथेचे संवाद आणि दृश्य अधिक प्रभावी करतात.
थोर साहित्यिक वि.स. खांडेकर यांचे आरवली येथील निवासस्थान तसेच भगवती मंदिर, धामापूर अशा पवित्र ठिकाणी चित्रीकरण करण्याचे भाग्य या लघुपटास लाभले.











