महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने १ नोव्हेंबर रोजी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा लांजाच्यावतीने रविवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लांजा शाळा क्रमांक ५ येथे गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा कार्यक्रमाचे ३० वे वर्ष असून लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने गेली ३० वर्ष हा गुणगौरव सोहळा शिक्षक समितीच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये इयत्ता चौथी,पाचवी,सातवी आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नासा इस्त्रो परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी,आदर्श शिक्षक,आदर्श शाळा तसेच संघटनेचे सेवानिवृत्त सभासद व नवनियुक्त शिक्षण सेवक आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या गुणगौरव सोहळ्यास लांजा पंचायत समितीच्या सभापती सौ.मानसी आंबेकर, उपसभापती आदेश आंबोळकर, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले यांचेसह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्व पंचायत समिती सदस्य तसेच संघटनेचे राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी या गुणगौरव सोहळ्यास सर्व सत्कारमूर्ती व सभासद बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक समितीचे लांजा तालुका अध्यक्ष दिलीप दिवाळे व सचिव दिनेश झोरे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लांजा तालुका कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत.