स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील अलोरे बाजारपेठ परिसरामध्ये झाडाखाली बसून बेकायदेशीररीत्या मुंबई मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या एका वृद्ध इसमावर रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त करण्यात आली असून संशयिताविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (LCB) पथक २३ सप्टेंबर रोजी अलोरे परिसरामध्ये गस्तीवर होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अलोरे बाजारपेठेतील भाजी मार्केटच्या पाठीमागे असलेल्या एका जंगली झाडाखाली संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पथकाने तातडीने तेथे छापा टाकला असता, एक वृद्ध इसम कोणत्याही परवान्याशिवाय मुंबई मटका जुगाराचे आकडे लिहून घेत लोकांकडून पैसे स्वीकारताना रंगेहात मिळून आला.
पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव चंद्रकांत सखाराम देवरूखकर (वय ६७ वर्षे, रा. अलोरे सोनरवाडी, ता. चिपळूण) असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून जुगाराच्या नोंदी असलेले साहित्य आणि ९३० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वैभव गजानन मोरे (ब.नं. १२२८, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चंद्रकांत देवरूखकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गु.र.नं. ११३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करत आहेत.












