तळेरे येथे डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावरील घटना

 मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत संभ्रम

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावर डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहिदास हरिश्चंद्र देसाई (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरून डंपर जात असताना रोहिदास देसाई हे डंपरच्या मागील चाकाखाली आले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते नेमके कोणत्या परिस्थितीत डंपरच्या चाकाखाली आले, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.

 

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनेचे नेमके स्वरूप आणि मृत्यूमागील कारण याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.