सजविलेल्या एसटी बसमधून प्रवाशांना अखेरचा सेवाप्रवास
सावर्डे येथे नागरिकांकडून पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक निरोप
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावर्डे येथील पिंपळ मोहल्ल्यातील रहिवासी मुश्ताक अहमद माद्रे हे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेतून तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि अपघातविरहित सेवेनंतर शनिवारी सेवानिवृत्त झाले. आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या माद्रे यांच्या निवृत्तीचा दिवस त्यांच्या कुटुंबीयांसह सहकारी आणि सावर्डेकरांसाठी भावनिक ठरला.
विशेष म्हणजे, मुश्ताक माद्रे यांचे वडील अहमद माद्रे हेदेखील एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे एसटी महामंडळाशी त्यांच्या कुटुंबाचे जुने नाते राहिले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुश्ताक माद्रे यांनीही एसटी महामंडळात चालक म्हणून सेवा बजावली. तब्बल ३२ वर्षांच्या या प्रवासात त्यांनी सुरक्षित आणि अपघातविरहित प्रवासी सेवा देण्याचा आदर्श निर्माण केला. सेवेतील शेवटचा दिवस अविस्मरणीय ठरावा, यासाठी त्यांच्यासाठी एसटी बस आकर्षक फुलांच्या माळांनी सजविण्यात आली होती. बसला फुगे आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजविलेल्या एसटी बसमधून त्यांनी प्रवाशांना आपली अखेरची सेवा दिली. यावेळी सावर्डे येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी एकत्र येत त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर यांच्यासह सावर्डे व्यापारी संघटना अध्यक्ष सूर्यकांत चव्हाण आणि व्यापारी, परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि हितचिंतक उपस्थित होते. सर्वांनी माद्रे यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचे कौतुक करून त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. एसटी महामंडळाच्या माध्यमातून हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य चालक करीत असतात. अशा जबाबदारीच्या सेवेत ३२ वर्षे अपघातविरहित सेवा बजावणे ही निश्चितच उल्लेखनीय बाब आहे. कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला दिलेले प्राधान्य यामुळे मुश्ताक माद्रे यांचा सेवाप्रवास संस्मरणीय ठरला आहे. सेवेतून निवृत्त होत असले तरी एसटी महामंडळाशी आणि प्रवाशांशी जोडलेले त्यांचे ऋणानुबंध कायम राहतील. त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि आनंद लाभो, अशा सदिच्छा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.













