रस्त्यावर निराधार अवस्थेत असलेल्या चिन्नमा आनंद नायर आजींना जीवन आनंद संस्थेचा आधार

विरार फाटा येथील समर्थ आश्रमात सुरक्षित निवारा

खारेपाटण : सांताक्रुझ-कालीना परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर बेवारस आणि असहाय अवस्थेत जीवन जगणाऱ्या चिन्नमा आनंद नायर या वृद्ध महिलांना जीवन आनंद संस्थेने मदतीचा हात दिला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी पुढाकार घेत त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून दिला.

 

रस्त्यावर राहिल्यामुळे त्यांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या डाव्या पायाला झालेल्या जखमेची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ४८ किडे आढळून आले. अत्यंत वेदनादायी परिस्थितीत असलेल्या या आजींना आधार, वैद्यकीय उपचार आणि योग्य देखभालीची नितांत गरज होती.

 

जीवन आनंद संस्थेच्या पुढाकाराने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना विरार फाटा येथील संस्थेच्या समर्थ आश्रमात दाखल करण्यात आले. त्यामुळे आता त्यांना सुरक्षित निवारा मिळाला असून, पुढील उपचार आणि देखभालीचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

या सेवाकार्यात स्वयंसेविका अनिता डिसूझा, संस्थेचे कार्यकर्ते गोविंद मार्गी, श्रेया घाडीगांवकर, भूषण मार्गी आणि कविता कदम यांनी सहकार्य केले.

 

रस्त्यावर निराधार अवस्थेत जगणाऱ्या व्यक्तींना केवळ निवारा उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणे, हा जीवन आनंद संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश आहे. चिन्नमा आनंद नायर यांना मिळालेला हा आधार संस्थेच्या सेवाभावी कार्याचे आणखी एक उदाहरण ठरले आहे.

 

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब म्हणाले, रस्त्यावर निराधार अवस्थेत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित निवारा आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, यासाठी जीवन आनंद संस्था सदैव प्रयत्नशील आहे.