सावंतवाडीत एमएनजीएलच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक 

 

नगराध्यक्षांचे पोलीस अधीक्षकांना पत्र : चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

भाजप नगरसेवकांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात सध्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) या कंपनीचे नाव सांगून मोबाईलद्वारे नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सायबर गुन्हेगार नागरिकांना बिलाची किंवा कनेक्शन जोडणीची खोटी माहिती देऊन, बिल न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन ओटीपी, कस्टमर आयडी व खाजगी माहिती मागत आहेत. या माहितीच्या आधारे नागरिकांच्या खात्यातील पैसे चोरून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात असून शहरात सर्वसामान्य व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन या सर्व प्रकरणाची सायबर गुन्हे शाखेकडून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

त्याचप्रमाणे शहरात आयुर्वेदिक व ॲलोपॅथिक औषधांचे अधिकारी असल्याचे भासवून काही संशयित भामटे नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. हे भामटे नागरिकांना विविध आजार असल्याचे सांगून वेगवेगळ्या संस्थांशी संबंध असल्याचे दाखवत संशयास्पद औषधे विकण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे घरोघरी फिरून रेकी केली जात असल्याने भविष्यात संघटित गुन्हेगारी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अशा इसमांचा शोध घेऊन त्यांची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. पोलीस निरीक्षकांना भेटलेल्या या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नीलम नाईक, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर आणि दिलीप भालेकर या लोकप्रतिनिधींचा समावेश होता.

दरम्यान, या वाढत्या सायबर गुन्हेगारीची गंभीर दखल घेत सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी शहरात गॅस बिल भरणे, अपडेट करणे किंवा जोडणीच्या नावाखाली नागरिकांना फसवणाऱ्या भामट्यांविरोधात काल रात्री अधिकृतपणे तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वसामान्य नागरिकांची झालेली फसवणूक आणि शहरात निर्माण झालेले चिंतेचे वातावरण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने तातडीने सायबर सेलतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी सौ. भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे.