कोकण कृषि विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविणार, कुलगुरू डॉ. संजय भावे सिडनीला रवाना

दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे ऑस्ट्रेलिया येथील सिडनीस्थित वेस्टर्न सिडनी विद्यापिठात दाखल झाले आहेत. तेथे सुरू असलेले कृषि संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान तसेच दोन्ही विद्यापिठांच्या समन्वयाने करण्यात येणाऱ्या शिक्षण आणि संशोधन र्काक्रमांचे नियोजन या भेटी दरम्यान होणार आहे. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प प्रमुख तथा विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, डॉ. संतोष सावर्डेकर आणि डॉ. योगेश परुळेकर हेही सिडनी येथे दाखल झाले आहेत.

 

या विद्यापिठाचे विद्यार्थी आणि दोन प्राध्यापक सिडनी येथे अध्ययन करण्यासाठी गेलेले आहेत. सिडनी येथे गेलेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांबरोबर डॉ. संजय भावे चर्चा करणार आहेत. तसेच वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटीमध्ये सुरू असलेले उपयुक्त संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान हा दापोली कोकण विद्यापीठामध्ये कशा प्रकारे कृषि अवलंब करता येईल, याबरोबरच दोन्ही युनिव्हर्सिटीमध्ये परस्परसंबंध प्रस्थापित करणे, माहिती तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करणे यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. त्यासाठी हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे, दापोली कोकण कृषि विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यासाठी सदैव प्रयत्न करण्याचे कुलगुरु यांनी अधोरेखित केले आहे. सर्व विद्यापीठ स्तरावर कुलगुरू डॉ. संजय भावे आणि सर्व सहभागी अधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.