कोकणचा प्रवास एका तासावर…!

कोकणचा प्रवास एका तासावर…!

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

नवीमुंबई विमानतळावरून आता चिपी विमानतळावर विमानसेवा नियमित सुरू रहाणे अपेक्षित आहे. अर्थात यासाठी प्रवाशांचाही प्रतिसाद अपेक्षित आहे. आज सिंधुदुर्गवासिय गोवा राज्यातील मोपा विमानतळावरून जाणाऱ्या मुंबई-विमानातून प्रवास करतात. परंतु कोकणवासियांनी जाणीव पुर्वक हक्काच्या असणाऱ्या चिपी विमानतळावरुन प्रवास केला तर विमानतळाला चांगले दिवस येतील. केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेचा (आरसीएम) उद्देश सर्वसामान्य नागरीकांना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यामध्ये त्रिस्तरीय सामंजस्य करार झाला आहे….

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतून कोकणात जाण्यासाठी रेल्वे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागत होता. परंतु आता नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या हवाई प्रवासातील अडथळे आता दूर झाले आहेत. कोकणात कधी काही व्हायच म्हटल की ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशीच स्थिती असते. अनेक अडथळे आणि विघ्न ही ठरलेलीच असतात. कोकणातील रायगड जिल्ह्याला राजधानी मुंबई गाठण्यासाठी जसा महामार्गाचा प्रवास जवळचा आहे त्याचबरोबर जलमार्गानेही मुंबईला सहज जाता येते. जस की हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईला रायगडमधील जनता जास्तीत-जास्त जलमार्गाचा वापर करून बोटीचा प्रवास करतात. सहज बोलता-बोलता रायगड भागातील लोकांना मुंबई गाठता येते. परंतु तोच प्रवास कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला सात तासांचा प्रवास मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना होतो तोच मुंबई-गोवा महामार्गाचा मुंबईचा प्रवास कोकणातील सिंधुदुर्गातील जनतेसाठी १०-१२ तासांचा आहे. अजुनही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात दोन-तीन ठिकाणी कोकणवासियांचा स्थितीत असल्याने कोकणवासियांचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरचा प्रवास फारसा सुखकर नाही आहे. अर्थात यावर्षी मे महिन्यापर्यंत तरी हा गेली तीस वर्षांहून अधिक काळ रखडलेला महामार्ग पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये कोकणचा हा महत्वपूर्ण असलेला राष्ट्रीय महामार्ग रखडण्याचे प्रमुख कारण जनतेची अनास्था आणि रायगड, रत्नागिरीतील राजकीय इच्छा शक्तिचा अभाव यामुळे गेली अनेकवर्षे हा राष्ट्रीय महामार्ग केवळ चर्चेतच राहीला. तो पूर्ण होण्यासाठीचा आवश्यक असणारा जनमाणसाचा जो आग्रह आणि रेटा लागतो तो कधी फारसा दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे. असो. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पुणे-कोल्हापूर महामार्गाने अनेकवर्षे प्रवास करावा लागला. हक्काचा आणि जवळच्या असलेल्या महामार्गावरून प्रवास करता आला नाही.
रायगड जिल्हा हा ठाणे, मुंबईला लागूनच असल्याने आणि जलमार्गाचा अत्यंत जवळचा पर्याय उपलब्ध असल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेचा फारसा प्रश्न नव्हता. परंतु महामार्गावरील जवळच्या असणारे तालुके, गावे यांना निश्चितच जलमार्गाचा प्रवासही काहीसा त्रासदायक, लांब वाटणारा आहे. परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मुंबईला रेल्वेचाच पर्याय उपलब्ध आहे. सिंधुदुर्गातील चिपी येथून मुंबईला जाण्यासाठी काहीकाळ विमानसेवा सुरू होती. परंतु अनेकवेळा विमान सेवेतील त्या कंपनीची अनियमित सेवा, प्रवाशांचा आवश्यक आणि अपेक्षित प्रतिसाद नसणे, काहीवेळा प्रवास भाडे अधिक होत असल्याने प्रवाशांनी हा हवाई प्रवास टाळला. परंतु सिंधुदुर्गातील आणि नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातील कोकणवासिय व पर्यटनासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरीत येणाऱ्यांसाठी आता नवीमुंबई विमानतळावरून विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. ही सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी जो आर्थिक भार होता तो महाराष्ट्र सरकारने उचलला आहे. खा.नारायण राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्योद्योगमंत्री ना.नितेश राणे, आ.निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आहे. पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी तर विमान कंपनी आणि राज्यसरकारमध्ये सतत प्रयत्नशील राहत दोन्ही मार्गावरील शंभर टक्के व्यवहार्यता तफावत निधी उपलब्ध करून देण्यासाठी (व्हायबिलीटी गॅप फंडीग) मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यसरकार यासाठी १६ कोटी ७४ लाख ६२ हजार खर्च करणार आहे.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून चिपी-पुणे, चिपी-हैद्राबाद, चिपी-बेंगलोर ही हवाई उड्डान होत आहे. परंतु मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याने ही विमानसेवा बंद होती. परंतु नवीमुंबई विमानतळावरून आता चिपी विमानतळावर विमानसेवा नियमित सुरू रहाणे अपेक्षित आहे. अर्थात यासाठी प्रवाशांचाही प्रतिसाद अपेक्षित आहे. आज सिंधुदुर्गवासिय गोवा राज्यातील मोपा विमानतळावरून जाणाऱ्या मुंबई-विमानातून प्रवास करतात. परंतु कोकणवासियांच्या हक्काच्या असणाऱ्या चिपी विमानतळाला यानिमित्ताने चांगले दिवस येतील. केंद्र सरकारच्या प्रादेशिक हवाई संपर्क योजनेचा (आरसीएम) उद्देश सर्वसामान्य नागरीकांना विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी हा आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यामध्ये त्रिस्तरीय सामंजस्य करार झाला आहे. या करारामध्ये अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या योजनेत केंद्रसरकार ८० टक्के व राज्यसरकार २० टक्के व्यवहार्यता तफावत निधी भरणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग चिपी येथील विमानसेवा मार्गस्थ होत असताना रत्नागिरी विमानतळावरून विमानसेवाही सुरू होईल यासाठी खा.नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री ना. उदय सामंत प्रयत्नशील आहेत. या हवाईसेवेने राजधानी मुंबईचा प्रवास अधिक जवळचा होईलच परंतु त्याचबरोबर कोकाच्या पर्यटन विकासाला पर्यटन व्यवसायालाही निश्चितच चालना मिळेल.