रत्नागिरी पाठोपाठ राजापूर न्यायालयातही बॉम्बची धमकी; यंत्रणा सतर्क, परिसर रिकामा करून तपासणी सुरू

राजापूर:

रत्नागिरी जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता राजापूर येथील दिवाणी व कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या ईमेलवरही इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकीचा संदेश प्राप्त झाला आहे. या मेलमुळे राजापूरच्या प्रशासकीय आणि सुरक्षा यंत्रणेतही एकच खळबळ उडाली आहे.

धमकीची माहिती मिळताच पोलीस दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी न्यायालयाची संपूर्ण इमारत रिकामी केली असून, यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले न्यायाधीश, वकील आणि विविध कामांसाठी आलेले पक्षकार यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे राजापूर न्यायालय परिसरात एकच तणाव निर्माण झाला असून नागरिकांची गर्दी जमली आहे. सध्या बॉम्ब शोध पथकाकडून इमारतीचा कोपराकोपरा तपासण्याचे काम सुरू असून कसून शोध घेतला जात आहे. रत्नागिरीप्रमाणेच राजापूरमध्येही असा मेल आल्यामुळे संपूर्ण पोलीस व प्रशासकीय यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, अशा प्रकारचे धमकीचे ईमेल राज्यातील इतरही काही न्यायालयांमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे.

राजापुरात पोलीस निरीक्षक अमित यादव घटनास्थळी हजर आपल्यासह कार्य कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले आहे