कणकवलीत मसूरकर किनई रस्त्यावर मच्छी विक्रेत्यांचे अतिक्रमण

नगरपंचायतीची कारवाईसाठी डोळेझाक!

अधिकृत मच्छी मार्केट असतानाही रस्त्यावरच विक्रीचा बाजार

कणकवली : कणकवली नगरपंचायतीचे अधिकृत मच्छी मार्केट उपलब्ध असतानाही शहरातील मसूरकर किनई रस्त्यावर काही मच्छी विक्रेत्यांकडून थेट रस्त्यावरच मच्छी विक्रीची दुकाने थाटली जात आहेत. कलमठ व आचरा परिसरातून येणारे हे विक्रेते ठराविक वारांना रस्त्यावरच मच्छी विक्री करत असताना कणकवली नगरपंचायत प्रशासनाकडून मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अधिकृत मच्छी मार्केटमध्ये बसून नियमांचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

कणकवली शहरातील अनेक रस्त्यांवर अतिक्रमणे आणि बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच मसूरकर किनई येथून गांगो मंदिराकडे जाणारा रस्ता मच्छी विक्रेत्यांनी व्यापल्याने नागरिकांना वाहतुकीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरच मच्छी विक्रीची दुकाने मांडली जात असल्याने या परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होत असून स्थानिक नागरिकांमधून नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

शहरातील सर्व मच्छी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी व्यवसाय करता यावा, यासाठी नगरपंचायतीने स्वतंत्र मच्छी मार्केटची उभारणी केली आहे. असे असताना मसूरकर किनई रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना नगरपंचायत प्रशासन पाठीशी का घालत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दर रविवार, मंगळवार आणि बुधवार अशा ठराविक वारांना हे विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटून खुलेआम मच्छी विक्री करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अधिकृत मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.

 

दरम्यान, वर्षभरापूर्वी कणकवली आणि कलमठ हद्दीच्या मुद्द्यावरून मच्छी विक्रेत्यांनी कलमठ हद्दीत आचरा रस्त्यानजीक मच्छी विक्रीसाठी दुकाने थाटण्यास सुरुवात केली होती. यावेळी कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी तातडीने दखल घेत संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली होती. सातत्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने अखेर या विक्रेत्यांनी मसूरकर किनई रस्त्याचा पर्याय निवडल्याचे चित्र आहे. मात्र, कणकवली नगरपंचायतीच्या हद्दीत रस्त्यावर व्यवसाय सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

केवळ मसूरकर किनई रस्ताच नव्हे, तर कणकवली बसस्थानकाबाहेरही काही मच्छी विक्रेते रस्त्यालगत बसून मच्छी विक्री करत असतात. त्यामुळे शहरातील मच्छी विक्रेत्यांसाठी एकच नियम आणि सर्वांना समान न्याय हे धोरण नगरपंचायत प्रशासन राबवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

कणकवली नगरपंचायतीच्या मागील एका बैठकीतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर रात्रीच्या वेळी थांबणाऱ्या मच्छी विक्रेत्यांवर तसेच तेथे दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. मग मसूरकर किनई रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांबाबत प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

 

नियम पाळणाऱ्यांना भुर्दंड आणि नियम मोडणाऱ्यांना मुभा, अशी परिस्थिती निर्माण होणे शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे कणकवलीचे नगराध्यक्ष स्वतः लक्ष घालून संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करणार का? तसेच शहरातील सर्व मच्छी विक्रेत्यांना समान न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घेणार का, याकडे आता कणकवलीवासीयांचे लक्ष लागले आहे.