वेंगुर्लेत लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सवातील रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम…

दत्तराज कामतेकर द्वितीय; अनंत गावडे तृतीय, तुषार रेडकर व दिव्या बागायतकर उत्तेजनार्थ…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासह स्थानिक कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’ अंतर्गत भाजपा युवा नेते विशाल परब पुरस्कृत रील्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत वासुदेव खडपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.

इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत दत्तराज कामतेकर यांनी द्वितीय क्रमांकासह ३ हजार रुपये, तर अनंत गावडे (मालवणी आबा) यांनी तृतीय क्रमांकासह २ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकाचे १ हजार रुपयांचे पारितोषिक तुषार रेडकर, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकाचे १ हजार रुपयांचे पारितोषिक दिव्या बागायतकर यांनी पटकावले.
सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच कला, विचार, कौशल्य आणि कल्पकता व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. याच पार्श्वभूमीवर रील्स स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना आपली सर्जनशीलता सादर करण्याची संधी देण्यात आली. विविध विषयांवरील कल्पक आणि आशयपूर्ण सादरीकरणातून स्पर्धकांनी आपल्या कलागुणांची झलक दाखविली.

‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’मधील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्योजकता, कला आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर यांची सांगड घालणारा हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. सर्व विजेत्यांचे आयोजक संस्थांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्योती देसाई, सचिव वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य शुभदा नवार, आकांक्षा परब, काजल गिरप व दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या. तसेच इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव श्रीया परब, उपाध्यक्षा सई चव्हाण, एडिटर आरती गिरप, सदस्य रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, वैभवी दाभोलकर व हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती होती.

दोन्ही संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, समाजातील विविध घटकांना आपले कौशल्य आणि सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.