रायगड:
दुर्गराज किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला रायगड रोपवे येत्या ३ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा पूर्ववत सुरू होत आहे. रोपवे प्रशासनाकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने राज्यभरातील शिवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी रायगड रोपवे प्रशासनाचे राजेंद्र खातू यांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक हंगामपूर्व देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक सुरक्षा तपासणीच्या कामांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून रोपवे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. ही कामे पूर्ण करून १६ नोव्हेंबर २०२६ पासून सेवा सुरू करण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले होते. मात्र, दसरा आणि दिवाळीच्या सलग सुट्ट्यांच्या काळात रोपवे बंद असल्याने गडावर येणाऱ्या हजारो शिवप्रेमींची मोठी गैरसोय झाली होती आणि पर्यटकांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत होती.
शिवप्रेमींची होणारी गैरसोय लक्षात घेऊन रोपवे प्रशासनाने तांत्रिक देखभाल व सुरक्षा तपासणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून निश्चित वेळेआधीच, म्हणजेच ३ नोव्हेंबरपासूनच रोपवे सेवा शिवभक्तांच्या सेवेत दाखल होत आहे. प्रशासनाने कामांची गती वाढवून नियोजित तारखेच्या आधीच सेवा पूर्ववत केल्यामुळे यंदाच्या पर्यटन हंगामात गडावर जाणाऱ्या वृद्ध, महिला व बालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोपवे पुन्हा सुरू होत असल्याच्या बातमीने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे तरंग उमटले असून दुर्गराज किल्ले रायगडावर पुन्हा एकदा शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.












