पिंगुळीत ‘आपला गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जनजागृती रॅली

ग्रामपंचायत व आयुष्मान आरोग्य मंदिराच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘आपला गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत पिंगुळी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत पिंगुळी आणि आयुष्मान आरोग्य मंदिर पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, २ नोव्हेंबर रोजी ही रॅली काढण्यात आली.

या अभियानाच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, तसेच आरोग्याच्या विविध उपक्रमांबाबत माहिती पोहोचविण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या रॅलीमध्ये ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच मंगेश मसके, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, केशव पिंगुळकर, आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीम. सोनाली गोरे, जनआरोग्य कृती समितीचे सदस्य राजन पांचाळ यांच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.