मिलिंद कदम यांची चिपळूण रेल्वे स्टेशन अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अभिजीत धुरत व कोकण रेल्वे अध्यक्ष गणेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली नेमणूक
 प्रवाशांच्या प्रश्नांना मिळणार बळ

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेरशेत गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद काशीराम कदम यांची चिपळूण रेल्वे स्टेशन अध्यक्षपदी नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे (MRPM) अध्यक्ष व सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य (ZRUCC Member), रेल्वे मंत्रालय, अभिजीत धुरत व कोकण रेल्वे अध्यक्ष गणेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही नेमणूक करण्यात आल्याचे अधिकृत वृत्त आहे. या निवडीमुळे चिपळूण रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.
मिलिंद कदम हे गेली अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. खेरशेत गावापासून ते चिपळूण तालुक्यापर्यत त्यांनी अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. गावातील विकासकामे, तरूणांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, गरजूंना मदत करणे, तसेच प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांची ओळख समाजाभिमुख कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चिपळूण हे कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, मंगळूर या मार्गावर धावणाऱ्या अनेक गाड्या चिपळूण येथे थांबतात. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. त्यामध्ये नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, चाकरमानी, पर्यटक आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा समावेश आहे, त्यामुळे या स्थानकावरील सुविधा, स्वच्छता, सुरक्षा, तिकीट व्यवस्था, फलाटावरील सोयी याबाबत प्रवाशांच्या अनेक अपेक्षा आहेत. गेल्या काही काळात चिपळूण स्थानकावर प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. काही गाड्यांना थांबा नसणे, तिकीट खिडकीवर गर्दी, फलाटावर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची कमतरता, रात्रीच्यावेळी प्रकाश व्यवस्थेचा अभाव, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी सोयींची कमतरता, अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून वारंवार मांडल्या जात होत्या. या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक पातळीवर एक सक्षम प्रतिनिधी असणे गरजेचे होते. मिलिंद कदम यांच्या निवडीमुळे तो प्रश्न आता मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चिपळूणसारख्या महत्त्वांच्या स्थानकावर अध्यक्षपदी एका सक्रिय कार्यकर्त्याची नेमणूक केल्याने संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे चिपळूण रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि प्रवाशांना निशित स्वरूपात दिलासा मिळेल, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.