बिळवस भोगलेवाडीत घराला भीषण आग! ▪️घरासह वाहने जळून खाक

▪️ लाखोंचे नुकसान

मसुरे | झुंजार पेडणेकर

मालवण तालुक्यातील बिळवस भोगलेवाडी येथे गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुनिल सोमा भोगले यांच्या बंद घराला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत संपूर्ण घरासह आवारात उभी असलेली पाच वाहने जळून भस्मसात झाली असून, यात संबंधित कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी कुटुंबीय मुंबईत असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

मालवण-बागायत मार्गावरील बिळवस भोगलेवाडी येथील रहिवासी सुनील सोमा भोगले यांच्या राहत्या घराला गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. पहाटेची वेळ असल्याने परिसरात शांतता होती, मात्र आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

सुनील भोगले हे आपल्या पत्नी आणि मुलांसह कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यामुळे घटनेच्या वेळी घर बंद होते व घरात कोणीही नव्हते, यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीची तीव्रता इतकी भयानक होती की घरातील सर्व संसारोपयोगी साहित्यासह घराबाहेर उभी असलेली पाच वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये एक क्वालिस कार, रिक्षा आणि स्कूटर आदी वाहनांचा समावेश आहे. या दुर्घटनेत भोगले कुटुंबीयांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आग लागल्याचे निदर्शनास येताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेचा अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, ज्यामुळे शेजारील घरांना होणारा धोका टळला.

ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच सुनील भोगले हे मुंबईहून गावी येण्यास निघाले असून, ते आज सायंकाळपर्यंत गावी पोहोचल्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल. पोलीस पुढील तपास करत आहेत.