गाव विकासावर आणि शांततेवर भर
सावंतवाडी । प्रतिनिधी : महात्मा गांधी तंटामुक्त समिती, इन्सुलीची मासिक सभा सांस्कृतिक हॉल, कोंडवाडा, इन्सुली येथे अध्यक्ष कृष्णा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेच्या सुरुवातीला समितीच्या सचिव श्रीमती जागृती गावडे यांनी, समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. कृष्णा सावंत तसेच उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करून ग्रामसभेत निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
विशेष म्हणजे, या सभेत नागरिकांचा कोणताही तक्रार अर्ज प्राप्त झाला नव्हता, तरीही अध्यक्ष श्री. कृष्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते ठराव संमत करण्यात आले:
गाव इन्सुली तसेच क्षेत्रफळ येथे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे, जेणेकरून ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होणार नाही.सलग तीन सभांना विनाकारण गैरहजर राहणाऱ्या सदस्याचे नाव समितीमधून कमी करण्यात यावे.समितीची मासिक सभा आता दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी ठीक दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात यावी.
सभेची नोटीस व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकण्यात यावी आणि जे सदस्य ग्रुपवर नाहीत, त्यांना सचिव यांनी फोन करून कल्पना द्यावी, असे ठरविण्यात आले.
यावेळी अध्यक्ष श्री. कृष्णा सावंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्रामस्थांच्या तक्रारींवर योग्य तडजोड होईल याकडे आपण सर्वांनी कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून ग्रामस्थांच्या समस्या मिटतील. या सर्व कामाचा लेखा-जोखा लिखित स्वरूपात ठेवणे आवश्यक असून प्रत्येकाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. यासाठी समितीतील सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि पोलीस पाटील यांनी सहकार्य करावे, जेणेकरून आपली महात्मा गांधी तंटामुक्त समिती एक आदर्श समिती बनेल आणि गावात शांतता राखली जाईल. आपण सर्वांनी मिळून सामाजिक भावनेतून काम करूया.”
तसेच, माजी अध्यक्ष श्री. देऊलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. चर्चेदरम्यान सर्व उपस्थित सदस्यांनी आपली मोलाची मते मांडली. ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली.
सभेच्या शेवटी श्रीमती जागृती गावडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.












