दुर्ग गोविंदगड स्वच्छता मोहिमेत चिपळूण अर्बन बँकेचा उत्स्फूर्त सहभाग!

 बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले गड परिसराची स्वच्छता

चिपळूण (प्रतिनिधी) : राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या वतीने ऐतिहासिक दुर्ग गोविंदगडाच्या स्वच्छता व संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दर रविवारी सकाळी ७ वाजता शिवप्रेमी एकत्र येऊन गडाची स्वच्छता व संवर्धनाचे कार्य करीत आहेत. या उपक्रमात रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी चिपळूण अर्बन बँकेच्या अध्यक्षांसह अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वच्छता मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर श्री देवी रडजाई मंदिरात श्रीफळ अर्पण करून स्वच्छता कार्याला प्रारंभ झाला.
यावेळी गडावरील सदर परिसर, किल्ल्याचा परिसर, पाण्याची टाकी तसेच रडजाई मंदिर परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करण्यात आली. गडाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने सर्वांनी श्रमदानातून स्वच्छतेचे काम केले. राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट गेल्या १२ वर्षांपासून विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहे. दुर्ग गोविंदगडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे संवर्धन व जतन व्हावे, तसेच नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, अजय जाधव व सहकाऱ्यांनी दिली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देतानाच चिपळूण अर्बन बँकेने या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनी सामाजिक उपक्रमांमधील बँकेच्या सहभागाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “चिपळूण अर्बन बँक नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी होत असते. अशा विधायक आणि ऐतिहासिक वारसा जतन करणाऱ्या उपक्रमांसाठी बँक नेहमीच आपल्या पाठीशी राहील. चिपळूणमधील एकमेव ऐतिहासिक गड असलेल्या गोविंदगडासारख्या हेरिटेज वास्तूचे जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आजच्या मोबाईलच्या युगात नवयुवकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये शिवरायांच्या इतिहासाविषयी जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रतिष्ठान करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे.” अशा शब्दांत त्यांनी राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष अभिनंदन केले. या स्वच्छता मोहिमेत राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत, खजिनदार सौरभ टाकळे, शिवाजी गोवळकर, मंदार आवले, मंगेश भैरवकर, अजय जाधव, दुर्गवीर प्रतिष्ठानचे रोहित बालदे तसेच चिपळूण अर्बन बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, सीओ अरविंद भागडे, सीओ नितीन चिंगळे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐतिहासिक वास्तूंचे जतन, गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि नव्या पिढीमध्ये शिवइतिहासाची प्रेरणा जागविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, सामाजिक संस्थांसह सहकारी बँकांनीही अशा मोहिमांमध्ये सहभागी होणे ही निश्चितच सकारात्मक बाब आहे.