राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मंडणगडमधील पत्रकार सचिन माळी यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे सन्मान!

शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव; पत्रकारितेच्या सामाजिक योगदानाबद्दल अभिजीत देवळेकर यांनी व्यक्त केले मनोगत

मंडणगड (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंडणगड तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले पत्रकार सचिन माळी व यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीच्या वतीने जिल्हा महामंत्री अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मंडणगड येथील कार्यालयात हा छोटेखानी सन्मान सोहळा पार पडला.

यावेळी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य विजय जोशी, तसेच मराठी पत्रकार परिषद, मंडणगड तालुका अध्यक्ष सचिन माळी यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, जनतेच्या समस्या, विकासकामे आणि विविध सामाजिक घडामोडी प्रशासनासह समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार विजय जोशी आणि सचिन माळी सातत्याने करीत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही वस्तुनिष्ठ बातम्यांच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनून काम करणाऱ्या पत्रकारांचे योगदान निश्चितच मोलाचे आहे.

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजाला दिशा देणारे आणि लोकशाही अधिक सक्षम करणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विजय जोशी आणि सचिन माळी यांच्या पत्रकारितेतील कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही समाजाचीही जबाबदारी असल्याचे देवळेकर यांनी नमूद केले.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून पत्रकारांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करणारा हा उपक्रम ठरला.