रत्नागिरी : प्रिंटिंग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, श्रावणी ग्राफिक्सचे मालक आणि जाणीव फाऊंडेशनचे सचिव उमेश दत्तात्रय महामुनी (वय ५३) यांचे आज निधन झाले.
आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. उद्योजकतेसोबतच जाणीवच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. जाणीव फाउंडेशनचे सचिव म्हणून ते गेली १७ वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे योगदान देत आहेत.
प्रिंटिंग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला होता. श्रावणी ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवला. व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच सामाजिक बांधिलकी जपत जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असायचा.
त्यांच्या कुटुंबात पत्नी वैशाली, मुलगी श्रावणी, आई कल्पना दत्तात्रय महामुनी आणि भाऊ तेजस यांचा समावेश आहे.













