वैद्यकीय सुविधांची केली पाहणी
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्याकडून घेतली माहिती
चिपळूण (प्रतिनिधी) : भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, खेर्डी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. रावी मोरे यांनी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची तसेच उपलब्ध वैद्यकीय सेवा आणि सोयी-सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील आरोग्य सुविधांबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.
या भेटीदरम्यान सतीश मोरे यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. रुग्णालयातील स्वच्छता, आरोग्य सुविधा, वैद्यकीय उपकरणे, औषधोपचार व्यवस्था तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्याशी चर्चा करताना रुग्णालयातील उपलब्ध वैद्यकीय सुविधा, आरोग्य यंत्रणेचे कामकाज, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि आवश्यक सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती जाणून घेण्यात आली. कामथे उपजिल्हा रुग्णालय हे चिपळूण परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. त्यामुळे या रुग्णालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर सतीश मोरे यांनी रुग्णालयातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि समाधानकारक आरोग्य सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. यावेळी खेर्डी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. रावी मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.













