मंडणगड प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामपंचायत माहू-बोरघर येथील महसूल गाव बोरघर, ता. मंडणगड येथे . १ ऑक्टोबर २०२६ रोजी जल अर्पण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत गावात निर्माण करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे ग्रामपंचायत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे हस्तांतरण करून गावकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाची मालकी व जबाबदारी देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात जल यात्रा, जल दिंडी, जलपूजा, जलबंधन, जलशृंगार आदी उपक्रम घेण्यात आले. पाण्याची टाकी व नळ सजविण्यात आले. तसेच FTK द्वारे पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. उपस्थितांनी पाणी बचत, पाण्याचा योग्य वापर व जलस्रोतांचे संवर्धन करण्याची जल शपथ घेतली.
या कार्यक्रमास सभापती सौ. प्रणाली चिले, उपसभापती श्री. दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिल रटाटे, श्रीमती दीप्ती घडसी, गटविकास अधिकारी श्री. राजेंद्र आंधळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता श्रीमती कविता जवादे, शाखा अभियंता श्री. विशाल कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. मयुरेश भवारी, माजी सरपंच श्रीमती बोबले, पाणी व स्वच्छता विभागाचे श्री. जितेंद्र साळवी यांच्यासह बोरघर ग्रामस्थ व महिला मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.
गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षमपणे चालविण्यासोबतच पाणी स्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा संदेश या जल अर्पण दिनाच्या माध्यमातून देण्यात आला.












