संघटनात्मक बांधणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षविस्ताराबाबत चर्चा
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या नगरसेवक आणि मंडल अध्यक्षांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथील रायगड बंगल्यावर ही बैठक पार पडली.
या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप नगरसेवकांनी आतापर्यंत केलेली विकासकामे, नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राबविलेले उपक्रम तसेच संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक नगरसेवक आणि मंडल अध्यक्षांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कामकाजाची माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाची बूथस्तरीय रचना अधिक सक्षम करणे, संघटनात्मक बांधणीला गती देणे, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करणे, दापोली आणि मंडणगड नगरपंचायतींच्या निवडणुकांचे नियोजन तसेच ‘मन की बात’ कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात पक्षाची शिस्त, संघटनात्मक विस्तार आणि राजकीय रणनीती यांना प्राधान्य देऊन प्रत्येक पदाधिकारी व लोकप्रतिनिधीने सक्रियपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनीही उपस्थित पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधत पक्षाची संघटनात्मक वाटचाल, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.
या बैठकीला रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वहाळकर, अमित केतकर, केदार साठे, रत्नागिरी उत्तर जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस योगेश शिर्के, देवरूख नगराध्यक्षा मृणाली शेट्ये, गुहागर नगराध्यक्षा नीता मालप, चिपळूण उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे नगरसेवक आणि मंडल अध्यक्ष उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप संघटनेच्या आगामी वाटचालीला दिशा मिळण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीला अधिक गती मिळणार असल्याचे चित्र आहे.













