अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि श्वेता शालिनी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; २० ते २७ नोव्हेंबर दरम्यान रंगणार सात दिवसीय प्रशिक्षण
पुणे: राजकारण आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रात महिलांचे नेतृत्व अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी पुण्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी’ (ADYPU) आणि ‘श्वेता शालिनी फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकनेत्री – वुमन्स एक्झिक्युटिव्ह लीडरशिप प्रोग्रॅम’ (Loknetri – Women’s Executive Leadership Programme) या विशेष सात दिवसीय निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या प्रतिष्ठित गटासाठी (Inaugural Cohort 2026) लोकप्रतिनिधी देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांची निवड झाली आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना संपूर्ण प्रायोजकत्वासह (Fully Sponsored Seat) या प्रशिक्षणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. २० ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान चऱ्होली बुद्रुक येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ संकुलात हा उपक्रम पार पडणार आहे.
उद्घाटन आणि मान्यवरांची उपस्थिती कार्यशाळेच्या पहिल्या गटाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ‘श्वेता शालिनी फाउंडेशन’च्या संस्थापिका श्वेता शालिनी यांच्याशी संवादाच्या (फायरसाईड चॅट) कार्यक्रमाने या निवासी उपक्रमाची सुरुवात होईल. या कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार असून, या सोहळ्यासाठी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी (Field Visits) सात दिवसांच्या या सखोल प्रशिक्षणात तन्वी चांदोस्कर यांच्यासह निवड झालेल्या इतर महिला प्रतिनिधींना वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, धोरणकर्ते, वित्त तज्ज्ञ आणि संवाद तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश आहे:
- नेतृत्व आणि राजकीय मुत्सद्देगिरी: नेतृत्व ओळख, वाटाघाटी कौशल्ये, आणीबाणीच्या परिस्थितीचे व्यवस्थापन आणि प्रभावी संवाद.
- अर्थसंकल्प आणि तंत्रज्ञान: सार्वजनिक वित्त व्यवस्थापन, निधी उभारणी, सीएसआर (CSR) भागीदारी आणि नियोजनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर.
- प्रशासकीय कार्यपद्धती: संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर) सरकारी विभागांचे कामकाज आणि योजनांच्या अंमलबजावणीचे बारकावे.
- प्रत्यक्ष क्षेत्रभेटी: प्रशिक्षणादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देऊन जलसंधारण व ग्रामसभेच्या कामाचा अभ्यास केला जाईल. तसेच २५ नोव्हेंबर रोजी पुण्यातील ‘यशदा’ (YASHADA) आणि ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ या संस्थांना भेटी देऊन धोरण निर्मिती व अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेतली जाईल.
आयोजन आणि समारोप या उपक्रमाचे आयोजन ‘लोकनेत्री’च्या संचालिका स्नेहा मेहता, शैक्षणिक संचालक प्रा. केदार कुलकर्णी आणि कार्यक्रम समन्वयक गायत्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबर रोजी धोरणात्मक संवाद, प्रकल्प सादरीकरण आणि मार्गदर्शकांशी (Mentors) संवादाने या निवासी कार्यशाळेचा समारोप होणार आहे. या निवडीबद्दल तन्वी चांदोस्कर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.













