रत्नागिरी पोलीस दलाच्या एआय आधारित ‘RAIDS’ ॲपच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील एका खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. RPPN26_000106_RAIDS_…
तपासादरम्यान रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘RAIDS’ ॲपचा वापर करून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेवरून चेहरा तयार करण्यात आला आणि हे छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटलांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याचे मार्गदर्शन परभणी पोलिसांना देण्यात आले. या तांत्रिक प्रक्रियेमुळे मृत व्यक्तीची ओळख गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) अशी पटली असून, या प्रकरणी मृताचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले या दोन संशयित आरोपींना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.












