देवरुखमध्ये जुन्या वादातून दुचाकीस्वाराला पाच जणांकडून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख तेलीवाडी येथे मागील तक्रारीचा व वादाचा राग मनात धरून एका दुचाकीस्वार तरुणाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नटेवाडी हरपुडे ते तेलीवाडी जाणाऱ्या रोडवर गणपती विसर्जन घाटाच्या पुढील बाजूच्या गल्लीमध्ये घडली असून, याप्रकरणी सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील फिर्यादी रोहित हरिश्चंद्र किर्वे (वय ३७, रा. देवरुख तेलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून घरी जात असताना संशयित आरोपी समिक्षा सतिष किर्वे आणि सुगंधा सुरेश किर्वे यांनी त्यांना वाटेत थांबवून लाकडी दांडक्याने पाठीवर आणि मानेवर मारहाण केली. त्यानंतर संशयित आरोपी सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे (सर्व रा. तेलीवाडी देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी त्या ठिकाणी येऊन लाकडी काठीने कमरेवर, उजव्या व डाव्या हातावर आणि पाठीवर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांना जमिनीवर खाली पाडून त्यांच्या छातीवर लाथ मारून दुखापत केली. या मारहाणीत रोहित किर्वे यांच्या उजव्या हाताला गंभीर मार लागून फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस पुढील तपास करत आहेत.