श्री विठ्ठल-राम पंचायतन मंदिरात महापूजा, वारकरी भजन, पुंडलिक भेट पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
राजापूर : कोकणातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या राजापूर बाजारपेठेतील श्री विठ्ठल-राम पंचायतन मंदिरात शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे ५.३० वाजता श्रींची महापूजा व अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत वारकरी संप्रदायाची भजने सादर केली जाणार आहेत. सायंकाळी ४ वाजता पुंडलिक भेट पालखी सोहळा पार पडणार असून, रात्री ८ वाजता महाआरती, गाऱ्हाणे आणि भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्तिकी एकादशीला वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असून, विठ्ठलभक्तांसाठी हा दिवस श्रद्धा, भक्ती आणि चैतन्याचा असतो. राजापूरच्या श्री विठ्ठल-राम पंचायतन मंदिराला लाभलेली धार्मिक परंपरा आणि कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून असलेली ओळख यामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.या धार्मिक सोहळ्याचे आयोजन संभाजी पेठ मित्र मंडळ राजापूर, विठ्ठल-राम पंचायतन मंदिर ट्रस्ट राजापूर, संभाजी पेठ महिला मंडळ आणि संभाजी पेठ युवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना तसेच पुंडलिक भेट पालखी सोहळ्याला राजापूर शहर व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून श्री विठ्ठलाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













