संघर्ष समितीचे अनधिकृत उपसा बंद करण्याचे तहसिलदारांना निवेदन
मंडणगड प्रतिनिधी : दुष्काळाचे पार्श्वभुमीवर मंडणगड तालुक्यातील तुळशी धरणातून खाजगी पंपाचे मदतीने सुरु असलेला पाणी उपसा चौकशी करुन तातडीने बंद करावा या करिता 20 नोव्हेंबर 2026 रोजी संघर्ष समिती मंडणगड यांच्यावतीने तहसिलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले यावेळी समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाची प्रतकार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, रत्नागिरी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उप जिल्हाधिकारी दापोली यांना पोहच करण्यात आली आहे. निवेदनात लघुपाटबंधारे विभागाने तुळशी धरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. खाजगी पंपांच्या सहाय्याने होत असलेल्या पाणी उपसाची सविस्तर चौकशी करावी. पाणी उपसा करणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृत परवानगी आहे किंवा नाही, याची तपासणी करावी. विनापरवाना किंवा नियमबाह्य पाणी उपसा तात्काळ बंद करावा. धरणातील सध्याचा पाणीसाठा, पाणी उपसाचे प्रमाण आणि पाणी वापरबंदीचे नियम यांची माहिती सार्वजनिक करावी. दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य द्यावे. धरणाच्या पाण्याचा खाजगी वापर करण्यासंदर्भात कोणाला परवानगी दिली असल्यास त्याची प्रत व परवानगीच्या अटी उपलब्ध करून द्याव्यात.केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल संघर्ष समितीला देण्यात यावा. या आठ मागण्या करण्यात आला आहेत. या संदर्भात समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी पत्रकारांना दिलेल्या माहीतीनुसार मंडणगड तालुका दुष्काळाचे परिस्थितीचा सामना करत असताना तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत आहे. नागरिक, शेतकरी तसेच पशुधनाचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तुळशी धरणातून काही व्यक्तींकडून खाजगी पंप बसवून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पाण्याचा वापर खाजगी बागायती व वैयक्तिक कारणांसाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले. धरणाच्या विविध भागांत खाजगी पंप बसवून पाणी उपसा होत असल्याची माहिती समोर आली. सार्वजनिक धरणातील पाण्याचा खाजगी वापर होत असल्यास ही बाब गंभीर आहे. धरणातील पाणीसाठा हा सार्वजनिक हिताचा विषय असून त्याचे नियोजन करताना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याचा विचार होणे आवश्यक आहे, असे संघर्ष समितीचे वतीने अरविंद येलवे म्हटले आहेत. या प्रकारात आणखी एक गंभीर बाब निदर्शनास येत आहे. धरणाच्या परिसरातील मोकळ्या जागेत गुरे-ढोरे, पाळीव जनावरे तसेच रानटी जनावरांचा वावर असतो. याच परिसरात पाणी उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपांच्या तारा उघड्यावर टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. या विद्युत तारांचे योग्य संरक्षण नसल्यास तारांचे इन्सुलेशन खराब होणे, तार तुटणे किंवा विद्युत प्रवाहाचा संपर्क परिसरातील पाणी अथवा जमिनीशी येणे यामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये जनावरांसह नागरिकांच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने स्थळपाहणी व चौकशी करावी. सर्वसामान्य नागरिकांच्या पाण्याच्या हक्काचे संरक्षण करावे, ही मागणी आहे. अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.












