सरपंचांच्या निर्णायक मताने श्वेता शिंदे विजयी; उपसरपंचपदी वर्णी
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत गुरुवारी चांगलीच रंगत पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाल्याने निवडणुकीत अटीतटीची परिस्थिती निर्माण झाली. अखेर सरपंचांच्या निर्णायक मताने श्वेता संतोष शिंदे यांचा विजय झाला असून त्यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
मावळते उपसरपंच कोलगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी गुरुवारी शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक घेण्यात आली. सरपंच निता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) गटातर्फे उमेश रामदास चिपळूणकर यांनी तर शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने श्वेता संतोष शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य आणि थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच असे एकूण १२ सदस्य आहेत. मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी सहा मते मिळाल्याने निवडणूक समसमान मतांवर येऊन ठेपली. त्यामुळे सर्वांचे लक्ष सरपंचांच्या निर्णायक मताकडे लागले होते. नियमानुसार सरपंचांना निर्णायक मताचा अधिकार असल्याने सरपंच सौ. निता शिंदे यांनी आपले निर्णायक मत श्वेता शिंदे यांच्या बाजूने दिले. त्यामुळे श्वेता संतोष शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी शिरगांव येथे ठाकरे गटातून शिंदे गटात झालेल्या राजकीय पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सहा विरुद्ध सहा अशा अटीतटीच्या लढतीनंतर सरपंचांचे एक निर्णायक मत विजयासाठी महत्त्वाचे ठरले. त्यामुळे शिरगावच्या राजकीय वर्तुळात या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. श्वेता संतोष शिंदे यांच्या उपसरपंचपदी निवडीनंतर त्यांचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे. या निवडणुकीवेळी ग्रामपंचायत अधिकारी सौ. भाग्यश्री जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी उपस्थित होते.












