चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अशोकभाई कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील किसान सभेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून शेतकरी वर्गाचे प्रश्न आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अशोक कदम यांच्या बिनविरोध निवडीबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष राकेशशेठ जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी सहाय्यक सरव्यवस्थापक संतोष जाधव, अल्पसंख्याक जिल्हा कार्यकारिणी सदस्य खालिद पटाईत तसेच सिव्हिल इंजिनिअर पंकज जाधव उपस्थित होते. अशोक कदम यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या अनुभवाचा, संघटनात्मक कौशल्याचा आणि सामाजिक कार्याचा किसान सभेच्या विस्तारासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल अशोकभाई कदम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.












