पोलिसांकडे कारवाईची मागणी!
परवानगी नसताना बाईक सेवा सुरू असल्याचा संघाचा आरोप
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरात सुरू झालेल्या कथित अनधिकृत ‘रॅपिडो बाईक’ सेवेला चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाने विरोध दर्शविला आहे. या सेवेला परिवहन विभागाची परवानगी नसल्याचे सांगत संबंधित व्यवसायावर तातडीने कारवाई करावी आणि ही सेवा बंद करावी, अशी मागणी संघाच्या वतीने चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण तालुका प्रवासी रिक्षा चालक-मालक संघाने शुक्रवारी २० नोव्हेंबर रोजी हे निवेदन दिले आहे. चिपळूण शहरामध्ये अनधिकृत रॅपिडो बाईक सेवा सुरू झाल्याचे निदर्शनास आले असून या व्यवसायाला परिवहन खात्याकडून परवानगी नसल्याचे संघाचे म्हणणे आहे. या सेवेमुळे शहरातील अधिकृत रिक्षा व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता संघाने व्यक्त केली आहे. आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या रिक्षाचालकांच्या व्यवसायावर अशा अनधिकृत सेवेमुळे परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप खेतले, शिवाजी चौक रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष विनायक रेडीज, प्रशांत गोरिवले, रामदास भोजने, संजय जोशी, सचिन चिले, रवींद्र घाडगे, सचिन गोरिवले, प्रशांत कदम, संतोष नलावडे, भाऊ मोरे, संदीप जाबरे, अखिल जुवेकर, नितीन मोरे, शराफत हमदुले, सईद वांगडे, विठ्ठल दाते आणि इतर रिक्षाव्यवसायिक उपस्थित होते.












