जयंद्रथ खताते यांच्या कार्यालयासमोर वारकऱ्यांचा सन्मान
चिपळूण (प्रतिनिधी) : धामणवणे पिटलेवाडी येथून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे कार्तिकी वारीला निघालेल्या वारकऱ्यांचे खेर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते जयंद्रथ खताते यांच्या कार्यालयासमोर हा स्वागत सोहळा पार पडला. पंढरीच्या दिशेने विठ्ठल नामाचा गजर करीत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या आगमनाने खेर्डी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
यावेळी जयंद्रथ खताते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन उर्फ अबु ठसाळे, खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी सरपंच रविंद्र फाळके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र यादव, अण्णा दाते, माजी उपसरपंच अभिजीत खताते, माजी उपसरपंच प्रसाद सागवेकर, अभिजीत खरावते, संतोष कोकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि विठ्ठल भक्तीचा वारसा जपणाऱ्या या वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यात आला. या स्वागतामुळे वारकऱ्यांच्या उत्साहात भर पडली. सर्व वारकऱ्यांची कार्तिकी वारी सुखकर, निर्विघ्न आणि मंगलमय होवो, अशी प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली.












