दारूच्या नशेत किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला
आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्यात
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येथील फोंडेकरवाडी येथे किरकोळ वादातून लोखंडी रॉडने डोक्यात जीवघेणा हल्ला करून एकाचा खून केल्याची घटना रविवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (वय ५२) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विष्णू दशरथ तळेकर (रा. गडगे सखल) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सूर्यकांत फोंडेकर आणि आरोपी विष्णू तळेकर हे एकमेकांसोबत दारू पीत असत. रविवारीही विष्णू हा सूर्यकांत यांच्या घरी गेला होता. दोघांनी एकत्र दारू प्यायली तसेच दुपारचे जेवणही सूर्यकांत यांच्या घरी केले.
त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सूर्यकांत फोंडेकर आणि विष्णू तळेकर यांच्यामध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विष्णू याने घरात असलेल्या लोखंडी रॉडने सूर्यकांत यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सूर्यकांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.
हल्ला केल्यानंतर सूर्यकांत हे गंभीर अवस्थेत पडलेले असतानाही विष्णू याने त्यांच्या बाजूलाच चटई अंथरून झोप घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, रात्री पावणे आठच्या सुमारास सूर्यकांत यांचा पुतण्या भिकाजी हा त्यांना हाक मारण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला सूर्यकांत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले, तर त्यांच्या बाजूलाच विष्णू तळेकर हा चटईवर झोपलेला आढळून आला. भिकाजी याने सूर्यकांत यांना काय झाले आणि कोणी मारले, अशी विचारणा केली असता, गंभीर अवस्थेत असलेल्या सूर्यकांत यांनी विष्णू याने लोखंडी रॉडने आपल्याला मारल्याचे सांगितल्याची माहिती आहे.
यानंतर फोंडेकरवाडीतील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यावेळी आरोपी विष्णू याने ग्रामस्थांना जातिवाचक उल्लेख करत धमकी दिल्याची तक्रारही कणकवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ‘माझे काय करणार तुम्ही, तुम्हालाही मारेन,’ अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी विष्णू तळेकर याला ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई सुरू आहे.
दरम्यान, मयत सूर्यकांत फोंडेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे आणण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास कणकवली पोलिस करीत आहेत.












