महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २८ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय संस्कृत कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून हैदराबाद येथील संस्कृत अकादमीचे संचालक डॉ. मधुसूदन पेन्ना उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे हे संमेलन प्रथमच रत्नागिरीत होत आहे. आधुनिक काळातही संस्कृतमध्ये काव्यरचना करणारे अनेक कवी आहेत. त्यांच्यापैकी काही कवी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली प्रतिभा काव्याच्या माध्यमातून सादर करणार आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हे कविसंमेलन रंगणार आहे. हे संमेलन सर्वांसाठी निःशुल्क असून कार्यक्रमस्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सकाळी १०.३० ते ११.४५ या वेळेत उद्घाटन, ११.४५ ते १ या वेळेत आधुनिक संस्कृत काव्य या विषयावर डॉ. मधुसूदन पेन्ना यांचे मुख्य भाषण होणार आहे. दुपारी १ ते २ भोजन, २ ते ५ काव्यवाचन आणि ५ ते ५.३० या वेळेत समारोप होणार आहे. कविसंमेलनामध्ये डॉ. श्रीनंद बापट, नीरज दांडेकर, महाबल भट्ट, राजेश ठक्कर, डॉ. कीर्ति कुलकर्णी, वरुण रानडे, राजेंद्र भावे, डॉ. संदीप जोशी, डॉ. दिनकर मराठे, चैतन्य पाडळकर, सौ. वैशाली हळबे या संस्कृत कविता सादर करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम संस्कृत व मराठी भाषेत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात जास्तीत जास्त कवी, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि या कार्यक्रमाच्या समन्वयक आणि महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.













