दिवसा भरवस्तीत बालकावर लोखंडी रॉडने हल्ला; संशयित महिलेचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी
खेड : प्रतिनिधी
मुलांनी घराबाहेर खेळायला जावे, मित्रांसोबत वेळ घालवावा आणि मोकळ्या वातावरणात बालपण अनुभवावे, ही प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. मात्र, खेड शहरातील कोंडी आळी परिसरात सात वर्षीय बालकावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने या अपेक्षांनाच धक्का बसला आहे. खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चिमुरड्यावर लोखंडी रॉडने हल्ला होण्याची घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण शहरातील पालकांच्या सुरक्षिततेच्या भावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत तेजस उपेंद्र घोडे या सात वर्षीय बालकाच्या डोक्यावर बुरखाधारी अज्ञात महिलेने लोखंडी रॉडने वार केला. भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बालकाचा कोणाशी वाद नसताना त्याच्यावर असा हल्ला का करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. घराजवळील मैदानात खेळण्यासाठी मुलांना पाठवतानाही आता विचार करावा लागणार का? लहान मुलांना घराबाहेर सुरक्षितपणे खेळण्याचे स्वातंत्र्य राहणार नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः शाळा, मैदाने आणि रहिवासी वस्त्यांमध्ये लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संशयित महिलेचा तातडीने शोध घ्यावा, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिची ओळख पटवावी आणि हल्ल्यामागील नेमके कारण उघड करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मुलांचे संरक्षण ही केवळ पालकांची जबाबदारी नसून, त्यासाठी समाज आणि यंत्रणेचीही तितकीच भूमिका महत्त्वाची आहे. खेडमधील या घटनेनंतर केवळ तपास पूर्ण होणे पुरेसे नाही, तर भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे आवश्यक आहे. अन्यथा, मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर पाठवतानाही पालकांच्या मनात भीती कायम राहणार आहे.













