झूडीओ फ्रँचायझी आणि मंत्रालयातील बनावट नोकरीचे आमिष; रत्नागिरीत १ कोटी १० लाखांची फसवणूक

रत्‍नागिरी : प्रतिनिधी
झूडीओ या नामवंत कपड्याची फ्रँचायझी घेउया अशी बतावणी करत प्रौढाची तसेच त्‍याच्या दोन मावस बहिणींपैकी एकीला मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर म्हणून खोटे नियुक्तीपत्र तर दुसरीला मंत्रालयातील बांधकाम विभागातील कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीसाठी इंटरव्युवचे खोटे पत्र देत तब्बल 1 कोटी 10 लाख 1 हजार 83 रुपयांचा चुना लावला. फसवणूकीचा हा प्रकार 18 नोव्हेंबर 2024 ते 21 नोव्हेंबर 2026 या दोन वर्षांच्या कालावधीत गाडीतळ परिसरात घडला आहे.
आकाश प्रकाश रसाळ (रा.परटवणे,सरोदेवाडी,रत्‍नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्‍याच्या विरोधात रॉबीन स्टिव्हन्स सोन्स (49,रा.मयुरेश अपार्टमेंट जयस्तंभ,रत्‍नागिरी) यांनी शनिवार 21 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, संशयित आरोपी आकाश रसाळ याने फिर्यादीला आपणू झूडीओ या नामवंत कपड्याच्या ब्रँडची फ्रँचायझी घेउया असे सांगून त्‍यांच्याकडून तब्बल 1 कोटी 10 लाख 22 हजार 54 रुपये उकळले. परंतू त्‍यानंतर संशयिताने फिर्यादीला फ्रँचायझी दिली नाही. फिर्यादीने त्‍याच्याकडे आपल्या पैशांची मागणी केल्यावर त्‍याने एकूण रक्कमेपैकी केवळ 12 लाख 20 हजार 971 रुपये परत केले. उर्वरित 98 लाख 1 हजार 83 रुपये परत केलेले नाहीत.
त्‍याचप्रमाणे संशयिताने फिर्यादीची मावस बहिण विधाता किशोर भोळे (रा.सोहम रेसिडन्सी जोशी पाळंद,रत्‍नागिरी) हिला मंत्रालयात डेप्युटी कलेक्टर म्हणून खोटे नियुक्तीचे पत्र दिले. तसेच फिर्यादीची दुसरी मावस बहिण पद्यमश्री सचिन पेटकर आणि तिचे पती सचिन सुनिल पेटकर (रा.म्हाडा कॉलनी बोरीवली पूर्व मुंबई) हिला मंत्रालयातील बांधकाम विभागातील कार्यालयात क्लार्क म्हणून नोकरीसाठी इंटरव्युव असल्याचे खोटे पत्र दिले. त्‍यासाठी संशयिताने एकूण 15 लाख रुपये घेतले. परंतू त्‍याने खोटे नियुक्ती पत्र दिल्याचे समजल्याने फिर्यादीने त्‍याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्‍याने त्‍या 15 लाखांपैकी केवळ 3 लाख रुपये परत केलेले असून उर्वरित 12 लाख रुपये परत केलेले नाहीत. अशा प्रकारे संशयित आकाश रसाळ याने फिर्यादीला कपड्याची फ्रँचायझी आणि त्‍याच्या दोन मावस बहिणींना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत सरकारी नोकरीची खोटी कागदपत्रे तयार करत एकूण 1 कोटी 10 लाख 1 हजार 83 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 316(2),318(4),336(2),336(3),337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.