समुद्रासह जमीन, वाळू आणि दलदलीतही धावणाऱ्या विशेष सुरक्षा वाहन
सागरी सुरक्षा, गस्त, बचावकार्य आणि आपत्कालीन मोहिमांसाठी होव्हरक्राफ्टचा प्रभावी वापर
मालवण | प्रतिनिधी : मालवण चिवला किनारपट्टीवर सोमवारी (२३ नोव्हेंबर) भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड) चे अत्याधुनिक होव्हरक्राफ्ट हे विशेष सुरक्षा वाहन काही कालावधीसाठी दाखल झाले. समुद्राच्या पाण्यावर वेगाने धावण्याबरोबरच जमीन, वाळू आणि दलदलीच्या भागातूनही मार्गक्रमण करण्याची क्षमता असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण वाहनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. समुद्र आणि जमिनीवरही सहजपणे संचार करू शकणाऱ्या या होव्हरक्राफ्टचे अनोखे रूप पाहून अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. काही कालावधी नंतर हे वाहन पुढे मार्गस्थ झाले.
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले भारतीय तटरक्षक दल देशाच्या सागरी सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. किनारपट्टीवरील गस्त, संशयास्पद हालचालींवर नजर, तस्करीला प्रतिबंध, शोध व बचावकार्य तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचविण्यासाठी तटरक्षक दलाकडून अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर केला जातो. त्यामध्ये होव्हरक्राफ्ट हे विशेष महत्त्वाचे वाहन मानले जाते.
होव्हरक्राफ्टचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याबरोबरच जमिनीवर, दलदल भागात ही धावण्याची क्षमता! ‘एअर कुशन व्हेईकल’ (ACV) या तंत्रज्ञानावर आधारित हे वाहन शक्तिशाली पंख्यांच्या साहाय्याने स्वतःच्या खाली हवेचा दाब निर्माण करते. त्यामुळे वाहनाचा मुख्य भाग पृष्ठभागापासून किंचित उचलला जातो आणि पाणी, वाळू, चिखल किंवा सपाट जमिनीवरून त्याला मार्गक्रमण करता येते. सामान्य बोटींप्रमाणे खोल पाण्याची आवश्यकता नसल्याने उथळ समुद्रकिनारे आणि दुर्गम किनारी भागातही हे वाहन उपयुक्त ठरते.
किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अशा होव्हरक्राफ्टना विशेष महत्त्व आहे. समुद्रातील नियमित गस्त, उथळ पाण्यातील हालचाली, किनाऱ्यावर उतरण्याचा सराव आणि आपत्कालीन बचाव मोहिमांमध्ये त्यांचा उपयोग होतो. तसेच किनारी तळांदरम्यान प्रवास करताना आवश्यकतेनुसार तांत्रिक तपासणी किंवा थांब्यासाठीही ही वाहने किनाऱ्यावर आणली जाऊ शकतात.
दरम्यान, सोमवारी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गस्तीच्या अथवा विशेष सुरक्षा अभियान माध्यमातून होव्हरक्राफ्ट आले असावे असे बोलले जात होते. मात्र होव्हरक्राफ्ट ने नागरिकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण केले.













