चिपळूण नगरपरिषदेतर्फे २९ नोव्हेंबरला भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन

२५ व ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात मुला-मुलींना संधी
 सात वयोगटात रंगणार जलक्रीडेचा थरार

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या वतीने शहरातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नगरपरिषद हद्दीतील रहिवासी मुला-मुलींसाठी भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नगरपरिषदेच्या जलतरण तलावात ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत २५ मीटर आणि ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारांचा समावेश असून, मुलगे व मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सहा वर्षांखालील, ८ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील आणि १८ वर्षांखालील अशा सात वयोगटांत स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे विविध वयोगटांतील नवोदित जलतरणपटूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. लहान वयापासूनच मुलांमध्ये जलतरणाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यातील क्रीडागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच स्थानिक जलतरणपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगरपरिषदेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर यांच्याशी ९७६४६१०९०७ या क्रमांकावर, तर नावनोंदणीसाठी प्रितम जाधव यांच्याशी ९५२७२२२३१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. चिपळूणमधील जलतरणप्रेमी, इच्छुक विद्यार्थी आणि नवोदित खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चिपळूण नगरपरिषदेने केले आहे.