चिपळूण शहरातील पीर सय्यद मुराद साहेब यांचा १७ रोजी उर्स मुबारक

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील शिवनदीच्या कडेला असलेला प्रसिद्ध दर्गा हजरत पीर सय्यद मुराद साहेब यांचा वार्षिक उर्स मुबारकला गुरुवार दि. २६ पासून सुरुवात होणार असून शुक्रवारी उर्स मुबारकचा मुख्य कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.
चिपळूण शहराच्या मध्यभागी शिवनदीच्या कडेला एक छोटासा परंतु टुमदार दर्गा आहे. हजरत मुराद सय्यद हज यात्रा करून इस्लामच्या प्रसार आणि प्रचारासाठी कोकणात आले आणि चिपळूण येथील शिवनदी परिसरात स्थिरावले होते. अनेक दिवस त्यांनी पाणी अन्न काहीही न घेता उपवास ठेवून इस्लामचा प्रसार केला आणि नमाज तसेच तीलावतमध्ये मग्न असायचे, कालांतराने ते आजारी पडले आणि त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला, त्याच ठिकाणी त्यांचा टुमदार दर्गा उभा आहे. गुलबर्गा येथील सुफीसंत हजरत बंदेनवाज यांचे वंशज म्हणून सय्यद मुराद यांची ओळख असल्यामुळे पुढे ते हजरत पीर सय्यद मुराद साहेब म्हणून उदयास आले. या दर्गेची देखभाल व व्यवस्थापन येथील हसवारे कुटुंब करतात, त्यामुळे त्यांना मुजावर हसवारे अशी उपाधी मिळाली आहे. प्रत्येकवर्षी हजरत पीर सय्यद मुराद साहेब यांचा उर्स मुबारक मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवार दि. २६ नोव्हेंबर रोजी रात्री दर्गा मुजावर दिलावर हसवारे यांच्या निवास्थानातून संदल मुबारकची मिरवणूक रातीबसह निघणार आहे आणि रात्री दर्गा मध्ये सादर होणार आहे. शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मग्रीब नमाज नंतर दर्गा परिसरात नियाजे लंगर सुरू होईल, रात्रौ उर्सचा मुख्य कार्यक्रम ग्यारवी शरीफ होऊन दोन दिवसीय उर्स मुबारकची सांगता होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दर्गा मुजावर दिलावर हसवारे यांनी केले आहे.