५४ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३० नोव्हेंबरपासून

आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन; विविध स्पर्धांचे आयोजन

दोडामार्ग : सुहास देसाई 

 

शालेय शिक्षण विभाग व विविध शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ५४ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ सोमवार, दि. ३० नोव्हेंबर व मंगळवार, दि. १ डिसेंबर २०२६ रोजी ‘दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग’ येथे आयोजित करण्यात आले आहे. ‘शाश्वत आणि विकसित भारतासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष’ हा यंदाच्या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे.

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकास सावंत असतील. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण व आरोग्य समिती सभापती प्रितेश राऊळ, शिक्षण समिती सदस्य रामा गवस, पं. स. सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, प्राचार्य राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर व सुबोध माने, तहसीलदार राहुल गुरव आणि मुख्याधिकारी संकेत गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार, दि. १ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विठ्ठल भास्कर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार चंद्रकांत नाईक, पं. स. सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, मुख्याध्यापक संजय पाटील व तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष आनंदा बामणीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

या कार्यक्रमाचे स्वरूप सोमवार, दि. ३० नोव्हेंबर : सकाळी ९.०० वा. प्रतिकृती नोंदणी व मांडणी, ११.०० वा. उद्घाटन सोहळा, दुपारी १२.०० वा. निबंध स्पर्धा आणि दुपारी २.०० वा. वक्तृत्व स्पर्धा.

मंगळवार, दि. १ डिसेंबर : सकाळी १०.०० वा. प्रतिकृती मूल्यमापन प्रक्रिया व प्राथमिक गट प्रश्नमंजूषा स्पर्धा, ११.०० वा. माध्यमिक गट प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि दुपारी ३.०० वा. पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे

राष्ट्रीय व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ, पंचायत समिती दोडामार्ग आणि शिक्षण प्रसारक मंडळ (सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, मुख्याध्यापक संजय पाटील, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि तालुका विज्ञान मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.