अखेर ‘ओंकार’ हत्तीची मूळ कळपाशी भेट

दोडामार्गच्या कोलझर जंगलात कुटुंबासह रमला

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांत भटकंती करत असलेल्या ‘ओंकार’ नावाच्या टस्कर हत्तीची अखेर आपल्या मूळ कळपाशी भेट झाली आहे. बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील घनदाट जंगलात हा भावनिक व निसर्गदत्त मिलाफ घडून आला असून या घटनेला उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून आपल्या मूळ कळपापासून विभक्त झालेला ‘ओंकार’ हत्ती सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवरील गावांमध्ये मुक्तपणे संचार करत होता. त्याच्या या सततच्या भटकंतीमुळे दोन्ही राज्यांतील वन विभागाची पथके त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होती आणि त्याच्या सुरक्षेसाठी व निरीक्षणासाठी खास टीमही तैनात करण्यात आली होती. दुसरीकडे, ओंकारच्या गावोगावच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान आणि मानवी वस्तीजवळील त्याचा संचार यावरून स्थानिक नागरिकांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह व चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

अखेर बुधवारी दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील घनदाट जंगलात ‘ओंकार’ आणि त्याचा मूळ कळप एकत्र आल्याचे निदर्शनास आले. उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी या वृत्ताला अधिकृत पुष्टी दिली आहे. ओंकार आपल्या कुटुंबात सुखरूप परतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कळपात परतल्यामुळे आता

ओंकारचा नैसर्गिक अधिवासातील वावर अधिक सुरक्षित आणि स्थिर होईल, असा विश्वास वन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कळपात परतलेला ओंकार आता आपल्या कुटुंबासह जंगलातच रमतो की पुन्हा वेगळी वाट स्वीकारत मानवी वस्तीकडे वळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.