मळगावमध्ये दोन रेबीज संशयित कुत्र्यांचा बंदोबस्त

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला

सावंतवाडी : मळगाव ग्रामपंचायतीच्या शेजारी दोन संशयित रेबीजग्रस्त कुत्र्यांचा वावर निदर्शनास येताच स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि ‘मिशन रेबीज’च्या पथकाने केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. जत्रेची पार्श्वभूमी आणि परिसरात असलेल्या शाळांमुळे निर्माण झालेला मोठा धोका वेळीच नियंत्रणात आणण्यात आला असून दोन्ही कुत्र्यांना पुढील उपचारासाठी गोवा येथे हलवण्यात आले आहे.

​मळगाव ग्रामपंचायत परिसरात दोन पिसाळलेले कुत्रे फिरत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ मिशन रेबीज संस्थेशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच मिशन रेबीजचे शिक्षणाधिकारी अमित अशोक नाईक यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही कुत्र्यांची पाहणी केली. कुत्र्यांमध्ये रेबीजची संशयास्पद लक्षणे आढळून आल्याने त्यांनी तातडीने पुढील कार्यवाहीची सूत्रे हलवली. यानंतर संस्थेचे आयबीसीएम (IBCM) अधिकारी वसंत विद्याधर तावडे देखील घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आणि योग्य ती खबरदारी घेत दोन्ही कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडण्यात आले.

​पकडलेल्या दोन्ही कुत्र्यांना सुरुवातीला सावंतवाडी येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात, पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय सेवा आयुक्तालयांतर्गत नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी त्यांना गोवा येथील पणजी-टोंका परिसरातील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मळगावमध्ये जत्रेची लगबग सुरू असतानाच शेजारील शाळांमधील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला होता; मात्र नागरिक आणि बचाव पथकाच्या समन्वयाने हा धोका टळला. या कारवाईवेळी सुधीर राऊळ, राजू परब, प्रेमनाथ राऊळ आणि नाना नेमळेकर आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

​सिंधुदुर्ग जिल्हा २०३० पर्यंत रेबीजमुक्त करण्यासाठी वर्ल्डवाइड व्हेटरनरी सर्व्हिस (WVS) यांच्या माध्यमातून मिशन रेबीज संस्था गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या व पाळीव कुत्र्यांचे मोफत लसीकरण, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती आणि ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन केले जात आहे. जिल्ह्याचेच रहिवासी असलेले अमित अशोक नाईक आणि वसंत विद्याधर तावडे हे या मोहिमेत सक्रिय योगदान देत आहेत.

​दरम्यान, परिसरात कोणताही कुत्रा अचानक आक्रमक झाल्यास किंवा रेबीजची लक्षणे दाखवत असल्यास नागरिकांनी स्वतः त्याला पकडण्याचा प्रयत्न न करता तात्काळ ७७४४०२९५८६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मिशन रेबीजच्या वतीने करण्यात आले आहे. मळगावमधील नागरिकांची जागरूकता आणि बचाव पथकाच्या तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.