तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे संपन्न

नावीन्यपूर्ण पद्धतीने झाले उद्घाटन, वैज्ञानिक सेल्फी पॉइंट्स व विज्ञान नाटिका लक्षवेधी ठरले

लांजा (प्रतिनिधी ): तालुक्यातील जगन्नाथ गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथे आयोजित 54 वे तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते झाले
तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई संचलित जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे व पंचायत समिती शिक्षण विभाग लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर, पं. स. सभापती मानसी आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील बालवैज्ञानिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी व्यासपीठावर लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, मुंबई संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. रमेश कदम, जिल्हा परिषद सदस्य मनिषा लाखण, लिला घडशी, विनीता गांगण, पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर, उमेश पत्की, दीपाली साळवी, साक्षी चव्हाण, रसिका मेस्त्री, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, गट विकास अधिकारी हिंदुराव गिरी, सरपंच रोहिणी आंबेकर, स्थानिक संस्थेचे अध्यक्ष दिगंबर पाटोळे, उपाध्यक्ष संजय पाटोळे, शाळा समिती चेअरमन कॅ. नामदेव पाटोळे, तळवडे ग्रामविकास मंडळचे अध्यक्ष प्रसाद पाटोळे , गटशिक्षणाधिकारी संदेश कडव, विस्तार अधिकारी विनोद सावंग, रवींद्र पांचाळ, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन मॉडेल मधून सेंद्रिय शेतीचा वापर करा आणि पर्यावरणासह आरोग्य जपा असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या विज्ञान दिंडीचा बालवैज्ञानिकांनासह उपस्थित मान्यवर, विज्ञान प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला. प्रशालेच्या प्रांगणात उभारलेल्या वैज्ञानिक संदेश देणाऱ्या सेल्फी पॉइंट्स व रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दुपारच्या सत्रात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली व जिल्हास्तर प्रथम व विभागीय स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेती ठरलेली ॲस्ट्रिया द लास्ट होप नाटिका लक्षवेधी ठरली.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संदेश कडव यांनी केले. तालुक्यातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांसह अनेकांनी प्रदर्शनाला भेट दिली व बाल वैज्ञानिकांनी मांडलेल्या नाविन्य पूर्ण प्रतिकृतींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश झोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई तसेच स्थानिक कमिटी, शाळा समिती पदाधिकारी व सदस्य, पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाला माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटना पदाधिकारी, शिक्षकेतर संघटना पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालकवर्ग, आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.