शासनाच्या बी. एल.ओ. कामातून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे

तालुक्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांची मागणी, लांजा तहसीलदारांना निवेदन सादर

लांजा( प्रतिनिधी) विविध अशैक्षणिक कामांनी शिक्षकवर्ग बेजार झाला आहे .त्यामुळे शासनाच्या बीएलओ कामातून शिक्षकांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली असून या मागणीचे निवेदन आज मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करण्यात आले.
तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात २५ ते ३० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एका- एका शिक्षकाकडे दोन- दोन, तीन वर्ग तसेच काही ठिकाणी संपूर्ण शाळेचा कार्यभार आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याचे महत्त्वाचे काम सांभाळूनच सातत्याने वेगवेगळी सर्वेक्षणे, शासनाच्या विविध योजना, सातत्याने होणारे नवनवीन उपक्रम, दररोजचे असंख्य लेखी अहवाल, माहिती देणे यासारखी अनेक कामे करावे लागतात. यातच पुन्हा बीएलओ चे कामही करावे लागते .या कामांचा शिक्षकांवर प्रचंड मानसिक, शारीरिक ताण येत आहे. याचा परिणाम शालेय कामकाजावर होत आहे.

लांजा तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये शिक्षक सोडून अन्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने बीएलओ कामासाठी घेतले आहेत. फक्त लांजा तालुक्यातच 100% बीएलओ म्हणून शिक्षकांची नेमणूक केली आहे. लांजा तालुक्यातील हा शिक्षकांवर होणारा अन्याय आहे .गेली चार ते पाच वर्ष आम्ही शिक्षक हे काम करत आहोत. या कामासाठी अन्य विभागातील कर्मचारी घेण्याचे शासनाचे निर्देश असतानाही फक्त शिक्षकांना घेतले जात आहे.
आणि म्हणूनच सध्या असणारी शिक्षकांची रिक्त पदे आणि शिक्षकांवर असलेला प्रचंड अशैक्षणिक कामांचा ताण लक्षात घेता लांजा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना बी एल ओ कामातून तात्काळ मुक्त करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.हे निवेदन सादर करताना पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर,लांजा तालुका अध्यक्ष संजय डांगे, प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष उमेश केसरकर , जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पावणे, उर्दु शिक्षक संघटनेचे श्री. खोडील, तसेच विजय कदम, उदय घाडी, मंगेश हटकर, सुदेश आयरे, संदीप घोरपडे, शैलजा तानवडे, मंगेश सरदेसाई, अनंत आंब्रे, अमित गराडे, सुधीर जाधव, संतोष पराडकर आदी उपस्थित होते.