देवरूख (प्रतिनिधी):
सरासरी पर्जन्यमानात तब्बल ३५ टक्के घट झाल्याने आगामी उन्हाळ्यात संगमेश्वर तालुक्यासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील १६५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला असून, या संकटाचा सामना करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने २६ कोटी ६४ लाख रुपयांचा संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे.
पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने तालुक्यातील विहिरी, विंधन विहिरी, नद्या आणि नाले यांसारखे नैसर्गिक जलस्रोत वेगाने आटण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता, तालुक्यातील ७२ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासोबतच नवीन जलस्रोत निर्माण करण्यासाठी ४६० विंधन विहिरी (बोअरवेल) प्रस्तावित करण्यात आल्या असून, ६५ गावांमधील २७४ जुन्या नळपाणी पुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती केली जाणार आहे.
केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी १२४ गावांमध्ये एकूण ४०२ विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये विहिरींची कामे, नदीपात्रातील गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढवण्याच्या उपाययोजनांचा समावेश आहे. दुसरीकडे, भूजल पातळी वाढवण्यासाठी तालुक्यात १२०० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यापैकी ९०० बंधाऱ्यांची कामे पूर्णत्वास गेली आहेत. उर्वरित बंधारेही लवकरच पूर्ण केले जाणार असून यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून विहिरींची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी हा २६ कोटी ६४ लाख रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती संगमेश्वरचे गटविकास अधिकारी अक्षय पाटील यांनी दिली आहे.













