चिवेली नळपाणी पुरवठा योजनेत ३२.९४ लाखांचा अपहार; तत्कालीन अभियंते व समिती पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

चिपळूण: चिवेली बौद्धवाडी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील नळपाणी पुरवठा योजनेत खोट्या नोंदी आणि अपूर्ण कामांचे प्रमाणपत्र सादर करून तब्बल ३२ लाख ९४ हजार ३९० रुपये ९७ पैसे इतक्या रकमेची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हा परिषद रत्नागिरीकडून सन २०१३-२०१४ मध्ये या योजनेसाठी ४८ लाख ८९ हजार ५३३ रुपयांची मान्यता देण्यात आली होती. या योजनेतील अपहाराबाबत श्री. शैलेश वसंत बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. समितीच्या चौकशी अहवालात मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करून आणि काम पूर्ण नसतानाही पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व अहवाल देत स्वतःच्या फायद्यासाठी शासनाची ३२,९४,३९०.९७ रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार (दि. ०९/०९/२०२६) चिपळूण ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपअभियंता डॉ. दिगंबर बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२१ वाजता गु.र.नं. ३७४/२०२६ (भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४७१, ३४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात श्री. संदेश दामोदर जंगम (तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. रत्नागिरी), श्री. ए. डी. पांडकर (तत्कालीन कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. रत्नागिरी), श्री. रमेश चोखाजी कांबळे (तत्कालीन शाखा अभियंता, जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, चिपळूण), नंदकिशोर दत्तात्रय शिर्के (अध्यक्ष, ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा समिती, चिवेली) आणि राजेश शिवाजी भोसले (सचिव, ग्रामआरोग्य पोषण पाणीपुरवठा समिती, चिवेली) या संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला