▪️आंबा, काजू, नारळ बागांच्या व्यवस्थापनासह आधुनिक तंत्रज्ञानावर मिळणार तांत्रिक मार्गदर्शन
मसुरे | झुंजार पेडणेकर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग व तालुका कृषी अधिकारी, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘किसान गोष्ठी’ कार्यक्रमाचे आयोजन काळसे येथे करण्यात आले आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन कृषी पद्धती तसेच ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर आंबा, काजू आणि नारळ बागांचे व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, ०१ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संगीतकार वसंतराव गोसावी सभागृह, कुळस्वामी मंदिर, काळसे, माळकेवाडी येथे पार पडणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री. बाळकृष्ण गावडे, अॅग्रीकार्ट शे. उ. कं. पणदूरचे संचालक मा. डॉ. श्री. सचिन चोरगे, आणि आंबडोस येथील प्रगतशील शेतकरी श्री. धोंडी अनंत नाईक उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाच्या मुख्य उपस्थितीत जि.प. सिंधुदुर्गचे वित्त व बांधकाम सभापती श्री. संतोष साटविलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती. भाग्यश्री नाईकनवरे, कणकवलीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. उमाकांत पाटील, पं.स. मालवणच्या सभापती श्रीमती. प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्री. घनःशाम झाड यांच्यासह जि.प. व पं.स. मधील इतर मान्यवर सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमात स्थानिक बियाणे व कृषी औजारे यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मा समिती मालवणचे अध्यक्ष श्री. प्रताप चव्हाण, ग्रा.पं. काळसेच्या सरपंच श्रीम. विशाखा काळसेकर आणि तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल करंदीकर यांच्यासह प्रगत शेतकरी गट (माळकेवाडी), संकल्प शेतकरी गट (परबवाडा), महापुरुष शेतकरी गट (बागवाडी) आणि काळसे धामापूर ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या किसान गोष्ठी व प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













