दोडामार्ग (सुहास देसाई )
यावर्षीच्या काजू हंगामात काजू बी प्रति किलो १८० रुपये या हमीदराने खरेदी करण्याचा एकमुखी ठराव साटेली-भेडशी येथील ‘तळकोकण फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर करण्यात आला. शासनाचे जीआय (GI) मानांकन लाभलेल्या दोडामार्गच्या काजूला हक्काचा आणि स्थिर बाजारभाव मिळावा, या उद्देशाने कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०) अंतर्गत क्लस्टर क्र. ५ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील काजू आपल्या उत्कृष्ट चवीमुळे आणि नैसर्गिक गुणधर्मामुळे बाजारपेठेत ‘सेंद्रिय काजू’ म्हणून ओळखला जातो. या काजूला जीआय मानांकन देखील मिळाले आहे. मात्र, कष्टाने पिकवलेल्या काजूला खुल्या बाजारपेठेत अनेकदा अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा आणि बाजारपेठेतील दरांवर नियंत्रण राहावे, यासाठी कंपनीने गेल्या वर्षीपासून पुढाकार घेतला आहे. गेल्या हंगामात कंपनीने ४० मेट्रिक टन काजूची खरेदी केल्यामुळे बाजारात काजूचे दर स्थिर राहिले आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला. यंदाही हंगामापूर्वीच प्रति किलो १८० रुपये दर जाहीर करून कंपनीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आपला काजू तळकोकण फार्मर प्रोड्युसर कंपनीला विक्रीसाठी देऊन या उपक्रमाला हातभार लावावा आणि चांगल्या बाजारभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.













