कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

१२.५०% लाभांशाला मंजुरी

लांजा (प्रतिनिधी) कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या. लांजा ची संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथील सभागृहात खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी १२.५०% लाभांशाला मंजुरी देण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतशील वाढीसाठी योगदान दिलेल्या २० जेष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले लांजा शाखेचे शाखाधिकारी संतोष घडशी यांनी संस्थेची २७ वर्षे यशस्वीपणे सेवा करून संस्थेला दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे पिग्मी व रिकरिंग प्रतिनिधी यांनी केलेल्या कामकाजाबद्दल प्रत्येकी तीन क्रमांकाचा रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाला सुरुवात होऊन विषयपत्रीकेतील संपूर्ण विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अहवाल सालात संस्थेची एकूण सभासद संख्या ५७७८ झाली असून भागभांडवल रु. १,९३,३०,६००/, निधी रु. ३,२०,१२,८३०/-, ठेवी रु. ४१,०३,४५,९८४/-, कर्ज रु. २७,७९,७८,४५५/-, गुंतवणूक रु. १९,३०,६७,४१३/-, खेळते भागभांडवल रु. ४९,७३,७४,५६८/-, एकत्रित व्यवसाय ६८,८३,२४,४३०/-व नफा रु. ५०,३१,८२७/- इतका असून आँडिट वर्ग सतत ‘अ’ आहे. वसुलीचे प्रमाण ९७.०६% आहे. सभासद लाभांश १२.५०% मंजूर करण्यात आला. संस्थेने एन.पी.ए, सी.डी. रेशो, सीआरएआर इ. निकषांचे काटेकोर पालन केले आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्हा असून संस्थेने रत्नागिरी, देवरुख व चिपळूण या तीन तालुक्याच्या ठिकाणी नवीन स्वमालकीच्या जागेत शाखा सुरु केल्या आहेत. तसेच संस्थेला गुहागर, दापोली व राजापूर या तीन तालुक्याच्या ठिकाणी नवीन शाखांना मंजुरी मिळाली असुन या तिन्ही शाखा सभासदांच्या सेवेकरीता लवकरच सुरु होणार आहेत. या शाखांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असल्याबद्दल तसेच संस्थेला सतत ‘अ ’ वर्ग प्राप्त होत असल्याबद्दल सभासदांनी अभिनंदनाचा ठराव केला.

संस्थेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “ दिपस्तंभ ” पुरस्कार व अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलक्सी इनमा पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय “ बँको ब्लू रिबन “ पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार सलग पाचव्या वर्षी संस्थेस प्रदान करण्यात आले. त्याबद्दल सभासदांनी अभिनंदनाचा ठराव केला. संस्था करीत असलेल्या प्रगतशील कामकाजाबद्दल तसेच संस्था पुरवीत असलेल्या आधुनिक सेवासुविधा इ. बद्दल सभासदांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांचे वतीने संस्थेच्या सभासदांकरीता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गास प्रा. के. बी. कुंभार यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत परवडी यांनी सभासदांचे कौतुक केले. तसेच संचालक मंडळाला सभासदांनी दिलेलं सहकार्य आणि दाखविलेल्या विश्वासामुळे हे अविश्वसनीय कामगिरी संस्थेला करता आल्याची त्यांनी सांगितले.
सभा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले. सभेचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे यांनी केले व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले